पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती : गाळ काढण्यावर प्राधान्य, मनहोल तपासणीचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले आणि मिठी नदी स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, ३१ मे २०२६ पर्यंत १००% नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

Apr 8, 2026 - 22:46
 0  6
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती : गाळ काढण्यावर प्राधान्य, मनहोल तपासणीचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
मुंबई नालेसफाई, अश्विनी भिडे

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसा कामांना गती देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन त्या परिसरातील कचरा आणि गाळ प्राधान्याने काढण्यावर भर देण्यात आला आहे.

महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या या मोहिमेत मुंबईतील सर्व लहान-मोठे नाले तसेच मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात स्वच्छता केली जात आहे. या कामांसाठी कालबद्ध नियोजन करण्यात आले असून, दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

यासोबतच मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका (Manhole) आणि ढाप्यांची सद्यस्थिती तपासण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत, त्या व्यवस्थित स्थितीत राहतील याची खबरदारी घेण्याचेही आदेश देण्यात आले.

आयुक्त अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र नाला आणि दादर-धारावी नाला येथे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

दादर-धारावी नाल्यात नागरिकांकडून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे निरीक्षण करण्यात आले. यावर उपाय म्हणून अशा ठिकाणी जाळ्या बसविण्याचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, काही ठिकाणी नाल्यांच्या भिंती खचल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्या भिंतींची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.

वरळी नाका आणि संत गाडगे महाराज चौक परिसरात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन, पावसाळी जलवाहिन्यांशी जोडलेल्या लॅटरल कनेक्शनची योग्य स्थिती राखण्याचे निर्देशही देण्यात आले.

मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात गुणवत्ता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी सांगितले. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या या व्यापक उपक्रमामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0