डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश; रुबल अग्रवाल यांचा भर

१४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर लाखो नागरिक येणार असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश रुबल अग्रवाल यांनी दिले.

Apr 9, 2026 - 22:36
 0  1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश; रुबल अग्रवाल यांचा भर
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

मुंबई, दि. ९ : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो नागरिक अभिवादनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीस अपर आयुक्त फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आयुक्त अग्रवाल म्हणाल्या की, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी. तसेच महानगरपालिकेने स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सेवा याबाबत योग्य नियोजन करावे. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता आणि साफसफाईसाठी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची रोषणाई, संविधानाच्या प्रतींचे वाटप, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, नियंत्रण कक्ष उभारणी, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व बेस्ट वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि पोलीस बंदोबस्त यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी सुरू केली असून, भाविकांसाठी सुरक्षित व सुकर व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0