युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी-चाकणमध्ये ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्र’चा शुभारंभ Slug:
महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून भोसरी आणि चाकणमध्ये ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्र’ सुरू; युवकांसाठी मोफत नोकरी, मार्गदर्शन व कौशल्य विकास सुविधा.
रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक परिसरात येणाऱ्या युवकांची फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे.
भोसरीतील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे, प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड. प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, अनेक तरुण योग्य मार्गदर्शनाअभावी आणि आर्थिक अडचणींमुळे मागे पडतात. बाहेरून येणाऱ्या युवकांना राहण्याची व्यवस्था, नोकरी शोधणे आणि करिअर घडवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा एजंटमार्फत त्यांची फसवणूकही होते. ही समस्या दूर करण्यासाठीच हे केंद्र पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रामध्ये नोंदणीपासून ते नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा शून्य खर्चात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. “विनामूल्य नोकरी” हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असून, युवकांनी कोणताही आर्थिक भार न घेता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरीतील फुगे प्रायमा (संविधान चौक) येथे आणि चाकणमधील कॅपिटल स्क्वेअर येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आतापर्यंत सुमारे दोन हजार युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, भविष्यात अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प यामागे असल्याचे महापौरांनी सांगितले.
“विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नव्हे, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0