देहूरोड केंद्रीय विद्यालयाजवळ दोन भुयारी मार्गांना मंजुरी; रखडलेल्या कामाला मिळाला हिरवा कंदील
देहूरोड-निगडी मार्गावरील केंद्रीय विद्यालय आणि ऑर्डनन्स फॅक्टरीदरम्यान दोन भुयारी मार्गांना तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार असून वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : देहूरोड-निगडी मार्गावरील केंद्रीय विद्यालय आणि ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात दोन भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याच्या प्रस्तावाला सदर्न कमांड ब्रिगेडियर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
देहूरोड येथील सदर्न कमांड कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत एनएचएआय, एमएसआरडीसी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सदर्न कमांड ब्रिगेडियर आशिष कटोज, कर्नल अमित श्रीवास्तव, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडून या भुयारी मार्गांना यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. आता संरक्षण विभाग आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या तत्त्वतः मान्यतेमुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीत काळोखे मळा ते हगवणे वस्ती दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेचाही आढावा घेण्यात आला. संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील महिन्यात निघणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण विभागाच्या क्षेत्रातून जाणाऱ्या पालखी मार्गाच्या दुरुस्तीसही मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय किवळे परिसरातील महावितरणच्या विद्युत वाहिन्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.