प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान व मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक – आर. विमला
दिल्लीतील ‘जनसंपर्क परिषद-2026’ मध्ये आर. विमला यांनी प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. परिषदेत देशातील 25 राज्यांतील माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी सहभागी झाले.
दिल्ली, दि. ९ : समाजात माहितीचा प्रसार वेगाने होत असताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी व्यक्त केले. यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधून काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित ‘जनसंपर्क परिषद-2026’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल, कर्नाटकच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आर. विमला म्हणाल्या की, माहिती क्षेत्रातील अधिकारी हे प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून ते समाजातील बदलाचे अग्रदूत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान युगात आपली भूमिका निश्चित करण्यासाठी या परिषदेत सखोल चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी माध्यम व्यवस्थापनातील बदल अधोरेखित करत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माहितीचा प्रसार अधिक प्रभावी होऊ शकतो, असे सांगितले. समाजमाध्यमांचा योग्य वापर करून माहिती जलदगतीने पोहोचवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कर्नाटकचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी फेक न्यूजचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या असल्याचे सांगत, वेळेवर अशा बातम्या ओळखून त्याविरोधात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती अधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल यांनी जनसंपर्क क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक असल्याचे सांगितले. या परिषदेमुळे अधिकारी एकमेकांशी संवाद साधून अनुभवांची देवाणघेवाण करतील आणि भविष्यासाठी नवा दृष्टिकोन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेत देशातील 25 राज्यांतील माहिती व जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले असून, संवाद आणि तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0