राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची चमक; नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड
२९ व्या राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीच्या डिजिटल उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना हा सन्मान मिळाला आहे.
राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची चमक; नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड
नवी दिल्ली, दि. ४ : प्रशासनातील पारदर्शकता, गतिमानता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासाठी दिल्या जाणाऱ्या २९ व्या राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांची निवड करण्यात आली आहे.
देशभरातून निवड झालेल्या १७ उत्कृष्ट ई-शासन उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील या तीन प्रकल्पांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत या स्वतंत्र श्रेणीचा समावेश करण्यात आला असून ग्रामीण भागातील डिजिटल सेवा वितरणातील उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ई-आरोग्य धमनी’ या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आरोग्य सेवा अधिक जलद, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित बनल्या आहेत.
तसेच, नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून विविध महापालिका सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या ‘पुणे ३६०’ या पुणे महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
ग्रामीण डिजिटल सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण गावपातळीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे. ग्रामपंचायत डिजिटायझेशन आणि सेवा वितरण अधिक सक्षम केल्याबद्दल कडेपूर ग्रामपंचायतीला राष्ट्रीय सन्मान मिळणार आहे.
या पुरस्कारांतर्गत विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सुवर्ण पुरस्कार विजेत्यांना १० लाख रुपये तर रौप्य पुरस्कार विजेत्यांना ५ लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम सार्वजनिक कल्याणाशी संबंधित प्रकल्पांच्या विस्तारासाठी आणि सेवा वितरणातील तफावत दूर करण्यासाठी वापरता येणार आहे.
राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या २९ व्या राष्ट्रीय ई-शासन परिषदेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या यशामुळे राज्याच्या डिजिटल प्रशासन मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0