डॉ. उदय सामंत यांची घोषणा: पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्राला गती
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 86.08 हेक्टर शासकीय जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश डॉ. उदय सामंत यांनी दिले. बैठकीस संजय राठोड यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे घोंगरी येथील 86.08 हेक्टर शासकीय जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सामंत यांनी सांगितले की, प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची प्राथमिक स्थळ पाहणी 26 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर 19 ऑगस्ट 2024 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भूमी निवड समितीमार्फत सविस्तर स्थळ पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर 86.08 हेक्टर ई-श्रेणी शासकीय जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्थानिक उद्योजकांकडून अद्याप औपचारिक मागणी प्राप्त झालेली नसली तरी पांढरकवडा परिसरात औद्योगिक क्षेत्राची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जमीन एमआयडीसीकडे विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला पांढरकवडा–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 शी जोडण्यासाठी जोडरस्ता विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बैठकीत मौजे वटफळी (ता. नेर, जि. यवतमाळ) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. भूसंपादन टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देताना, एकूण 550 एकर क्षेत्रापैकी प्रथम 250 एकर आणि त्यानंतर पुढील 250 एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे निर्देश उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0