नितेश राणे यांचा निर्धार: मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. वर्सोवा येथे आयोजित कार्यशाळेत विभागीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देऊन महाराष्ट्राला देशात ‘नंबर वन’ बनवण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने मत्स्यव्यवसायासाठी विविध योजना आणि उपक्रम सुरू केले असून, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्सोवा येथील भा.कृ.अनु.प. (भारतीय कृषी अनुसंधान परिषद) अंतर्गत केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, एमएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, संस्थेचे संचालक डॉ. एम. शाहू तसेच विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजनांद्वारे मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना दिली जात आहे. या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. तसेच योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम राबवावी आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
मत्स्यव्यवसाय विभागासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यात इतर राज्यांनीही महाराष्ट्राच्या योजनांचा अभ्यास करावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे टीमवर्कने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले की, राज्यात उत्पादकता वाढवण्यासाठी २८ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. क्लस्टर पद्धतीने योजना राबविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी मत्स्यव्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून, विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यशाळेदरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0