वाकड–म्हातोबानगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम; ४१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेची वाकड–म्हातोबानगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम; २४ मीटर डीपी रस्त्यावर ४१ अनधिकृत झोपड्या व बांधकामांवर कारवाई.
पुणे प्रतिनिधी - रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वाकड–म्हातोबानगर परिसरात मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. विकास आराखड्यातील २४ मीटर डिपी रस्त्यावर असलेल्या सुमारे १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या व बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे आणि दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे यांच्या पथकाचा सहभाग होता.
या कारवाईत महापालिकेचे स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, शहरी दळणवळण, नगररचना, विद्युत, अतिक्रमण विभाग तसेच अग्निशामक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आरक्षित जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये. अशा अतिक्रमणांमुळे भविष्यातील पायाभूत सुविधा व विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात.
नियोजनबद्ध विकासासाठी सहकार्य गरजेचे
शहरातील सार्वजनिक सुविधा, रस्ते आणि पायाभूत प्रकल्पांसाठी विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे. नियोजित आणि सुटसुटीत शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
आयुक्तांचे आवाहन
“शहरातील रस्ते व सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता रस्ता रुंदीकरण ही काळाची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास अशा कारवाया अधिक पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविता येतील,” असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील रस्ता रुंदीकरणास गती मिळणार असून भविष्यातील वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0