पिंपरी-चिंचवडमध्ये बेफाम टिप्परचा थरार; एकाच दिवशी तीन भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये बेफाम टिप्परमुळे एकाच दिवशी तीन भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी. आमदार अमित गोरखे ॲक्शन मोडमध्ये, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश.

Apr 8, 2026 - 14:50
 0  13
पिंपरी-चिंचवडमध्ये बेफाम टिप्परचा थरार; एकाच दिवशी तीन भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी- रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड शहरात बेफाम आणि अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज एकाच दिवशी घडलेल्या तीन भीषण अपघातांनी संपूर्ण शहर हादरले असून, या घटनांमुळे संतापाची लाट उसळली आहे.

आज शहरातील विविध भागांत टिप्परच्या धडकेत अपघातांची मालिका पाहायला मिळाली. बर्ड व्हॅली चौक येथे झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन अपघातांत दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

विशेष म्हणजे बर्ड व्हॅली चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी, जिथे जवळच शाळा आहे, तिथे एकाच दिवशी तीन अपघात होणे ही प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी तातडीने पोलीस आयुक्त, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बर्ड व्हॅली चौकात शाळेसमोर कायम वाहतूक कोंडी असते. आज येथे झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. या भागात झेब्रा क्रॉसिंगची अवस्था बिकट आहे, तसेच सिग्नल आणि योग्य स्पीड ब्रेकरचा अभाव आहे. अशा ‘ब्लॅक स्पॉट्स’ ओळखून तातडीने ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.”

आमदार गोरखे यांनी पुढे स्पष्ट केले की, शहरात जड वाहनांवर निर्बंध आणणे अत्यावश्यक आहे. रहिवासी भाग आणि मुख्य चौकांमध्ये टिप्परच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, शाळांजवळ सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक बसवणे, तसेच गर्दीच्या वेळी जड वाहनांच्या प्रवेशावर कठोर नियम लागू करणे आवश्यक आहे.

याशिवाय अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’वर पोलिसांची विशेष गस्त आणि कायमस्वरूपी वाहतूक रक्षक नेमण्याची मागणीही त्यांनी केली.

“केवळ सांत्वन करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे ही माझी प्राथमिकता आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करत आहे,” असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

दरम्यान, नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शहरातील रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0