अशोक खरात प्रकरणी SIT ची पत्रकार परिषद; ५९ आरोपी अटकेत, हजारो व्हिडिओ लिंक हटवल्या

अशोक खरात प्रकरणात SIT ने पत्रकार परिषद घेत तपासाची माहिती दिली; ५९ आरोपी अटकेत, ४६५० व्हिडिओ लिंक हटवण्यात आल्या.

Apr 7, 2026 - 23:46
 0  12
अशोक खरात प्रकरणी SIT ची पत्रकार परिषद; ५९ आरोपी अटकेत, हजारो व्हिडिओ लिंक हटवल्या
पत्रकार परिषद

नाशिक ब्यूरो 

देशभरात चर्चेत असलेल्या कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाने महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले की, हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून त्यात महिलांचा संबंध असल्यामुळे अनेक बाबी गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. पीडितांना त्रास होऊ नये यासाठी आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपासातील माहिती मर्यादित स्वरूपातच दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

१७ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध स्वरूपाचे अनेक गुन्हे समोर आले असून प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र तपास सुरू आहे. या प्रकरणात महिलांवरील अत्याचार, फसवणूक आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे गंभीर आरोप आहेत. आर्थिक व्यवहारांबाबतचा तपास प्रवर्तन संचालनालय (ED) करत असल्याची माहितीही देण्यात आली.

सध्या विशेष तपास पथक (SIT) ११ गुन्ह्यांचा तपास करत असून एकूण २४ अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १२ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. उर्वरित गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडे सुरू आहे.

तपासादरम्यान ३० पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपी श्रद्धेचा गैरफायदा घेत भीती दाखवून पैसे उकळत होता तसेच महिलांना दैवी शक्ती असल्याचे सांगून लैंगिक शोषण करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सायबर तपासादरम्यान पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असलेल्या ४६५० लिंक हटवण्यात आल्या असून ४५१ सोशल मीडिया अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. या संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याला विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील कोठडीसाठी न्यायालयात विनंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन करत वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज अधोरेखित केली. पत्रकार परिषदेला पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, किरण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0