सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी आग्र्यातून अटकेत
मुंबईतील सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने आग्रा येथून अटक केली असून आरोपीने गोळीबारासाठी इतरांना चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबई ब्यूरो - अनिल सावरे
मुंबई, दि. १७ एप्रिल २०२६: सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक करण्यात यश मिळवले आहे.
या प्रकरणी १ फेब्रुवारी २०२६ रोजी जुहू पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिनेमा दिग्दर्शकाच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तींनी अग्निशस्त्रातून गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षामार्फत सुरू होता.
तपासादरम्यान सुरुवातीला एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मोक्का (MCOCA) कायद्याचा समावेश करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रदीपकुमार रामसिंग जाठव उर्फ ‘गाठ’ (वय २२) याला १६ एप्रिल २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बाह पोलीस ठाणे हद्दीतून अटक करण्यात आली. तपासात असे समोर आले आहे की, आरोपी घटनास्थळी उपस्थित होता आणि गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींना चिथावणी देऊन त्यांना सहाय्य केले होते.
अटक आरोपीला १७ एप्रिल रोजी विशेष मोक्का सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0