नाशिकमध्ये पहिले अन्नपूर्ती धान्य एटीएम सुरू; २४ तास मिळणार धान्य
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये राज्यातील पहिले अन्नपूर्ती धान्य एटीएम सुरू झाले. पात्र लाभार्थ्यांना २४ तास धान्य मिळणार असून नागपूर आणि ठाण्यातही सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.
नाशिक ब्यूरो:
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती; नागपूर आणि ठाण्यातही धान्य एटीएम सुरू करण्याचे नियोजन – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. १७ ऑक्टोबर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वितरण अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थीकेंद्रित करण्याच्या दृष्टीने राज्यातील पहिले अत्याधुनिक ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांच्या ठरावीक वेळेच्या मर्यादेबाहेर, त्यांच्या सोयीनुसार चोवीस तास अन्नधान्य मिळविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील डिस्टिलरी क्वार्टर, गोरेवाडी रोड येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या धान्य एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त प्रशांत काळे, जिल्हा धान्य वितरण अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे धान्य वितरण अधिक सुलभ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य सन्मानाने आणि वेळेत मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विविध क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना अन्नधान्य वितरण व्यवस्थेतही त्याचा प्रभावी वापर आवश्यक आहे. ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सुमारे ५४ हजार रास्तभाव दुकाने कार्यरत असून, त्यांच्यामार्फत सुमारे सात ते साडेसात कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जातो. निर्धारित प्रमाणात धान्य वितरण करणे, प्रक्रियेतील त्रुटी कमी करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे याला शासनाचे प्राधान्य आहे.
रास्तभाव दुकानांच्या ठरावीक वेळेत धान्य घेणे अनेक नागरिकांना, विशेषतः कामानिमित्त दिवसभर बाहेर असणाऱ्या व्यक्तींना, अडचणीचे ठरते. धान्य एटीएमच्या सुविधेमुळे अशा लाभार्थ्यांना अधिक सोयीच्या वेळी धान्य घेता येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकतेवर भर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ई-पॉस यंत्रणा, आधार आधारित प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदींच्या माध्यमातून पारदर्शकता वाढविण्यात येत आहे. धान्याची उचल, वाहतूक आणि लाभार्थ्यांपर्यंत वितरण या प्रक्रियांतील अनावश्यक टप्पे कमी केल्यास वेळेची बचत होऊन व्यवस्थेची कार्यक्षमता वाढू शकते.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वितरणातील अडचणी कमी करून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नाशिकनंतर नागपूर आणि ठाण्यातही सुविधा
नाशिकमध्ये राज्यातील पहिले अन्नपूर्ती धान्य एटीएम सुरू झाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले. या यंत्राच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना चोवीस तास धान्य वितरणाची सुविधा उपलब्ध होणार असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपायुक्त प्रशांत काळे यांनी सांगितले की, या सुविधेमुळे स्थलांतरित कामगारांसह सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार धान्य मिळविणे सुलभ होणार आहे. महाराष्ट्रात प्रस्तावित तीन धान्य एटीएमपैकी पहिले एटीएम नाशिक येथे सुरू करण्यात आले असून, पुढील एटीएम नागपूर आणि ठाणे येथे सुरू करण्याचे नियोजन आहे.
उद्घाटनप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धान्य एटीएमच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने या उपक्रमामुळे पुढचे पाऊल पडले आहे.
Mi Marathi Live — स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज!