नाशिकच्या गोदाकाठावर वैदिक क्रांती! महर्षी गौतम गोदावरी गुरुकुल आता शृंगेरी शारदा पीठाच्या अधिपत्याखाली

नाशिकच्या पंचवटीतील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान गुरुकुल आता शृंगेरी शारदा पीठाच्या मार्गदर्शनाखाली संचालित होणार. जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी ऐतिहासिक घोषणा केली.

नाशिकच्या गोदाकाठावर वैदिक क्रांती! महर्षी गौतम गोदावरी गुरुकुल आता शृंगेरी शारदा पीठाच्या अधिपत्याखाली
नाशिक गुरुकुल, महर्षी गौतम गोदावरी गुरुकुल, शृंगेरी शारदा पीठ, जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती, वेद विद्या प्रतिष्ठान, वेद शिक्षण, वेदपाठशाळा, रवींद्र पैठणे गुरुजी, पंचवटी नाशिक, सनातन वैदिक धर्म, वैदिक संस्कृती

नाशिक ब्यूरो:

जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांची ऐतिहासिक घोषणा; गुरुकुलाच्या माध्यमातून वेदविद्येचा विस्तार होणार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पंचवटी नगरीत वैदिक शिक्षण आणि सनातन संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. पंचवटी येथील अग्रगण्य धार्मिक व आध्यात्मिक संस्था असलेल्या 'महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान' अर्थात वेदविद्या भवन गुरुकुलाचे संचालन आता कर्नाटकातील जगप्रसिद्ध दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदा पीठाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संलग्नीकरणाची घोषणा शृंगेरी पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी २ ऑक्टोबर रोजी गुरुकुलाला भेट देऊन केली.

गेल्या २४ वर्षांपासून वेदमूर्ती वेदाचार्य रवींद्र दत्तात्रय पैठणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुरुकुलामध्ये ऋषिकुमारांना शंभर टक्के मोफत वेदशिक्षण दिले जात आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या परंपरेचे जतन आणि वैदिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी गुरुकुलाने सातत्याने कार्य केले आहे. गुरुकुलाची निःस्वार्थ वेदसेवा आणि वैदिक परंपरेप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन शृंगेरी शारदा पीठाने या गुरुकुलाला आपल्या छत्रछायेखाली घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वेदमंत्रांच्या घोषात ऐतिहासिक सोहळा

२ ऑक्टोबर रोजी आयोजित या मंगलमय सोहळ्याची सुरुवात गुरुकुलातील ऋषिकुमारांच्या वेदमंत्रोच्चाराने झाली. यावेळी वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांनी सपत्नीक जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. गुरुकुलाच्या वैदिक परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शृंगेरी पीठाच्या माध्यमातून गुरुकुलाचा विस्तार करणार

यावेळी आशीर्वचन देताना जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी म्हणाले की, नाशिकची पंचवटी ही प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आहे. वैदिक सम्राट श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही घोषणा करणे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांचे शिष्य वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही शुद्ध वेदपरंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या गुरुकुलातील निःस्वार्थ सेवा आणि वेदाध्ययनाची परंपरा कौतुकास्पद आहे. शृंगेरी पीठाच्या माध्यमातून आता या गुरुकुलाचा विस्तार करण्यात येईल. भविष्यात शेकडो ऋषिकुमारांना एकाच वेळी अपौरुषेय वेद आणि सनातन संस्कृतीचे अध्ययन करता यावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

गुरु-परंपरेचा सर्वोच्च विजय – वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी

या ऐतिहासिक घोषणेनंतर भावना व्यक्त करताना प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी म्हणाले की, शृंगेरी शारदा पीठाने आमच्या गुरुकुलाचे संचालन स्वतःच्या हाती घेण्याचा निर्णय घेतला, हा माझे गुरुवर्य कै. वैदिक सम्राट श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांच्या तपश्चर्येचा आणि गुरुकुलातील बटूंच्या निःस्वार्थ वेदपठणाचा सर्वोच्च विजय आहे.

आता शृंगेरी पीठाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यार्थ्यांना अधिक व्यापक संधी उपलब्ध होतील. गुरुकुलातील विद्यार्थी अधिक सक्षमपणे संपूर्ण देशात तसेच जगभरात सनातन वैदिक धर्माचा आणि भारतीय संस्कृतीचा ध्वज फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्याला शृंगेरी शारदा पीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी. मुरली, श्रीराम गोपाल अय्यर, श्री जयंत भातंबरेकर, श्रीकृष्ण कुमार राव, अध्यापक वेदमूर्ती गोविंद पैठणे, सौरभ पाठक यांच्यासह नाशिकमधील विविध धार्मिक, सामाजिक आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच पैठणे परिवार आणि नाशिकमधील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान मिळविला.

नाशिकच्या भूमीत वेदविद्येची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी शृंगेरी शारदा पीठाने घेतलेला हा पुढाकार वैदिक शिक्षणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या संलग्नीकरणामुळे गुरुकुलाच्या कार्याला नवी दिशा आणि व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.