शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे सांगितले.

Aug 28, 2026 - 20:51
 0  7
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, शेतकरी, कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन, नाशिक, कृषी महाविद्यालय, मराठा विद्या प्रसारक समाज, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, महाविस्तार ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी उत्पादकता, उत्पादनखर्च, शेतकरी कर्जमुक्ती योजना,

नाशिक ब्यूरो:

नाशिक, दि. २८ : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबरोबरच त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा प्रभावी वापर करून उत्पादनखर्च कमी करत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.

कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता मर्यादित आहे, तर शेतीचा उत्पादनखर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना देऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

कृषी महाविद्यालयांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जमिनीचा पोत ओळखून योग्य प्रमाणात खतांचा वापर, विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी मॉडेल्स तसेच आधुनिक शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याची व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयांमध्ये होणारे प्रयोग शेतापर्यंत पोहोचले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी शिक्षण घेऊन शेतीला विविध प्रक्रिया उद्योगांशी जोडल्यास मोठी कृषी अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक

नाशिक जिल्ह्याच्या कृषी प्रगतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून येथील शेतकरी अत्यंत मेहनती आहेत. आदिवासी भागातही विविध प्रकारची वनोपज तयार केली जाते. देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी ८० टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते, तर नाशिकचा कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कमी खतांचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाकडून नवीन तंत्रज्ञानाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतीचा उत्पादनखर्च कमी करण्याचा प्रयत्न

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास उत्पादनखर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करून उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढविता येऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यासाठी राज्याने देशात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून ‘महाविस्तार ॲप’ तयार केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण पीकसाखळीबाबत मार्गदर्शन मिळू शकणार असून, विविध भाषांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

मविप्र संस्थेच्या योगदानाचा गौरव

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नूतन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ज्ञानमंदिर उभे राहिल्याचे सांगितले. मविप्र संस्थेचे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृषी क्षेत्रात वेगाने बदल होत असून हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन सक्षम करावे. कृषी व संबंधित क्षेत्रात रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी तसेच कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ घडविण्याचे आवाहन महाजन यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांची मदत

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मविप्र पत्रिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली. या संकुलात महाविद्यालयाची मुख्य इमारत तसेच मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह अशा विविध सुविधांनी युक्त इमारतींचा समावेश आहे.

कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, नितीन पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.