परराज्यातील मजुरांना मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी गजाआड
पिंपरी चिंचवड पोलिसांनी परराज्यातील मजुरांना मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड : परराज्यातून रोजगारासाठी आलेल्या मजुरांना रस्त्यात अडवून मारहाण करणे, त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेणे तसेच पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी महाळुंगे ते तळवडे रोडवरील महिला कंपनी गेट क्रमांक ९ परिसरात दोन दुचाकींवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी एका व्यक्तीस रस्त्यात अडविले. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे हस्तांतरित करून घेतल्याचा प्रकार घडला.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व गुन्हे शाखांना या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त सुहेल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहिती आणि मोबाईल व्यवहारांचे विश्लेषण करण्यात आले.
तपासात आरोपी परराज्यातील मजुरांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले. आरोपी संबंधित मजुरांना रस्त्यात अडवून मारहाण करीत, त्यांचे मोबाईल फोन हिसकावून घेत आणि जबरदस्तीने ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वतःच्या खात्यात हस्तांतरित करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पैसे देण्यास विरोध केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जात असल्याची माहितीही तपासात पुढे आली.
गुन्ह्यातील मोबाईल फोन तसेच आर्थिक व्यवहारांची तांत्रिक पद्धतीने तपासणी केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटविली. त्यानंतर पिंपरी परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केशव दरेश शेटे (वय ४६, रा. रुक्मिणी कॉलनी, पिंपरी गाव, पुणे), राजेश अनिल कुमार (वय ४५, रा. रुक्मिणी झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे स्टेशनजवळ, पुणे) यांच्यासह आणखी एका आरोपीचा समावेश आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपींविरुद्ध पिंपरी, चिखली आणि भोसरी पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, या मोबाईलचा वापर गुन्हे करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे.
तपासादरम्यान आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. परराज्यातील मजुरांना सुटीच्या दिवशी, विशेषतः गुरुवार आणि रविवार या दिवशी एकटे गाठून त्यांना जबरदस्तीने पकडणे, मारहाण करणे आणि त्यांच्या मोबाईलद्वारे ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेणे, अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त सुहेल राठोड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0