पवई तलावात जाणारे मलजल १ ऑक्टोबरपासून पूर्णतः रोखले जाणार; २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून एसटीपीकडे वळवले

पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाच्या २० प्रवाहांना इंटरसेप्ट करून भांडुप व फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळवण्याचे काम पूर्ण झाले आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून तलावात मलजल मिसळण्यास पूर्णतः आळा बसणार आहे.

पवई तलावात जाणारे मलजल १ ऑक्टोबरपासून पूर्णतः रोखले जाणार; २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून एसटीपीकडे वळवले
पवई तलाव, पवई लेक, BMC, मुंबई महानगरपालिका, मलजल, sewage, मलजल प्रवाह, sewage treatment plant, भांडुप STP,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

२० मलजल प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून एसटीपीकडे वळवले; ३ हजार ५६ मीटर नव्या मलनिस्सारण वाहिन्या

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२६ : पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते अन्यत्र वळविण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२६ पासून पवई तलावात मलजल मिसळण्यास पूर्णतः आळा बसणार आहे. या कामांतर्गत एकूण ३ हजार ५६ मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.

पवई तलावाचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना सुरू आहेत. तलावात होणारे मलजलाचे प्रदूषण रोखणे आणि मलजलावर मलजल प्रक्रिया केंद्रांमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

अभिजीत बांगर यांच्याकडून प्रकल्पस्थळाची पाहणी

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी ३० सप्टेंबर रोजी पवई तलाव परिसरातील प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली. कामांची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीचा त्यांनी आढावा घेतला. निर्धारित वेळेत तसेच आवश्यक गुणवत्तेच्या निकषांनुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पवई तलावात दररोज सुमारे १८ दशलक्ष लिटर मलजल

सन १८९१ मध्ये निर्माण झालेल्या पवई तलावाचा जलव्याप्त परिसर सुमारे २२३ हेक्टर असून, तलावाचा परिघ जवळपास ६.६ किलोमीटर आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६०० हेक्टरवर पसरले असून त्याची जलधारणा क्षमता सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लिटर आहे.

पवई तलावातील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी केला जातो. वाढते नागरीकरण आणि तलावात दररोज येणारे सुमारे १८ दशलक्ष लिटर मलजल यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प आणि मुंबई मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प विभागांनी तलावात मलजल मिसळणाऱ्या २० विसर्ग बिंदूंची (Outfall) पाहणी केली.

यापैकी १८ विसर्ग बिंदू आदि शंकराचार्य मार्गावर, तर दोन विसर्ग बिंदू तलावाच्या उत्तरेकडील पेरूगेट परिसरात आहेत.

२० प्रवाहांना इंटरसेप्ट करून एसटीपीकडे वळवले

पवई तलावात जाणाऱ्या मलजलाच्या प्रवाहास प्रतिबंध करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत आदि शंकराचार्य मार्गावरील १८ मलजल प्रवाह इंटरसेप्ट करून ते गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे (STP) वळविण्यात आले आहेत.

या कामासाठी एकूण ३ हजार ५६ मीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत. मलजलाचा बिगरपावसाळी प्रवाह आदि शंकराचार्य मार्गावरील विद्यमान मलनिस्सारण वाहिनीद्वारे भांडुप येथील मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आला आहे. या कामासाठी खोदण्यात आलेल्या चरांच्या पुनर्स्थापनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

तसेच, पेरूगेट परिसरातील दोन मलजल प्रवाह इंटरसेप्ट करून फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाचे प्रमाण नियंत्रित होऊन जलप्रदूषणास आळा घालण्यास मदत होणार आहे.

BMCच्या २०२६ च्या नागरी दैनंदिनीमध्येही पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू असल्याचे नमूद आहे.

८ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक एसटीपी उभारणार

पवई येथील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर दररोज ८ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे.

मुंबई मलनिस्सारण प्रकल्पामार्फत या केंद्राच्या उभारणीची कार्यवाही सुरू आहे. या केंद्रामध्ये मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून दररोज ८ दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे.

निविदेनुसार या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुदत डिसेंबर २०२८ आहे. मात्र, महानगरपालिकेकडून मे २०२७ पर्यंत हे केंद्र पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे ८ दशलक्ष लिटर मलजल या केंद्राकडे, तर उर्वरित ८ दशलक्ष लिटर मलजल भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे नेण्यात येणार आहे.

जलपर्णी काढण्याचे कामही सुरू

पवई तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्याची कार्यवाही जल अभियंता विभागामार्फत सुरू आहे. सध्या दोन हार्वेस्टर संयंत्रांच्या सहाय्याने जलपर्णी काढण्यात येत आहे.

तलावातील जलपर्णीचे अंदाजित प्रमाण २४ हजार मेट्रिक टन असून, २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत २० हजार ३४० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ८५ टक्के जलपर्णी तलावातून बाहेर काढण्यात आली आहे.

मलजल बंद झाल्यास जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा

अभिजीत बांगर यांनी सांगितले की, पवई तलावात मलजल मिसळल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत होता. पवई तलाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसंस्था असल्याने त्याची जल गुणवत्ता कायम राखणे आणि तलावात मलजल मिसळण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

मलजलातील सेंद्रिय घटकांमुळे जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. जलपर्णी काढण्याचे काम संयंत्राद्वारे नियमितपणे सुरू असले, तरी तिच्या नैसर्गिक वाढीचा वेग अधिक असल्याने ती पुन्हा वाढत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळणे थांबल्यानंतर जलपर्णीचा प्रादुर्भावही कमी होण्याची अपेक्षा आहे.

सद्यस्थितीत मलजलाचा तलावात होणारा प्रवेश थांबविण्यात आला असला, तरी तलावातील विद्यमान पाण्यात सेंद्रिय घटकांचे प्रमाण आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असून, उपलब्ध जैविक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून येत्या एक ते दोन महिन्यांत योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

१३ महिन्यांत काम पूर्ण

पवई तलावातील मलजल प्रवाह रोखण्याच्या या कामाची सुरुवात ऑगस्ट २०२५ मध्ये झाली होती. अवघ्या १३ महिन्यांच्या कालावधीत मलनिस्सारण प्रकल्प विभागाने हे काम पूर्ण केल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

यावेळी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मलनिस्सारण प्रकल्प) संजयकुमार पांडव, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेंद्र परब यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.