सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा : मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. १० : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आड येणार नाही. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आंबा-काजू उत्पादकांचे नुकसान
हवामानातील बदल आणि तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही.
अशा सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले. अशा प्रकरणांमध्ये आवश्यक पूर्तता करून संबंधित प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
हवामान केंद्रांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे निर्देश
हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांमधील अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग, विमा कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदींच्या अभावामुळे विमा लाभ मिळालेला नसल्याच्या तक्रारींवरही प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प नुकसानभरपाई मिळाल्याच्या प्रकरणाची दखल घेत त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांना संकटाच्या काळात शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे पात्र शेतकरी त्यांच्या हक्काच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहता कामा नये.
“सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी भूमिका मंत्री राणे यांनी व्यक्त केली.
पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले.