झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करावी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे आणि मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाप्रीतच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.

Aug 4, 2026 - 01:55
 0  11
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करावी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
झोपडपट्टी पुनर्वसन, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, माधुरी मिसाळ, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन योजना

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. ३ : पुणे आणि मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने करण्यात यावी. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाप्रीत यांच्या माध्यमातून या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पुणे आणि मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

या बैठकीस पुणे महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव चंद्रशेखर तरंगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुणे आणि मुंबई येथील सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय यावर चर्चा करण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी योग्य सल्लागार संस्था निश्चित करून पुढील कार्यवाहीचा आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच सुरू असलेल्या पुनर्वसन योजनांचे सर्वेक्षण, क्षेत्रनिहाय तपशीलांचे परीक्षण, आवश्यक क्षेत्र दुरुस्ती आणि प्रत्यक्ष स्थळावरील दृश्य पडताळणी यांसह विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखून आवश्यक कार्यवाही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुनर्वसन प्रकल्पांशी संबंधित आवश्यक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून वस्तुनिष्ठ आणि सविस्तर अहवाल सादर करावा. सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची योग्य पडताळणी करून विकासकामे निर्धारित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण होतील, यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.

पुणे आणि मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देताना पारदर्शकता, अचूक नियोजन आणि संबंधित विभागांमधील समन्वय यांना विशेष महत्त्व देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.