युवकांनी प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेऊन नवभारत घडवावा – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना युवकांनी भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेपासून प्रेरणा घेऊन नवभारत घडवावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नाशिक येथे केले.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. १० : आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत असतानाच युवकांनी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेपासून प्रेरणा घेऊन नवभारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसराचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले की, युवकांनी आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून घेत जागतिक दर्जाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या दृष्टीने महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा समन्वय साधल्यास भारत अधिक सामर्थ्यवान बनू शकतो.
महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान समर्पण भावनेने वेदपरंपरेचे संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करीत आहे. युवकांना त्यांच्या मुळांशी जोडण्याचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यपालांनी प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत अधिक व्यापक स्वरूपात काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नाशिक वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे राष्ट्रीय केंद्र बनेल
नाशिक हे केवळ तीर्थक्षेत्र नसून भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेतील महत्त्वाचे केंद्र असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. नाशिक येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर स्थापन होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी, संशोधक, संस्कृत अभ्यासक आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे साधक यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद ही केवळ प्राचीन परंपरा नसून भारताच्या भविष्यातील सामर्थ्याचा स्रोत ठरू शकतात. त्यामुळे वेदांचे संरक्षण, त्यावरील संशोधन, आधुनिक संदर्भातील अभ्यास तसेच वेदांचे ज्ञान आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांत भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख आवश्यक
वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेची विद्यार्थ्यांना लहान वयापासून ओळख करून देण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आधुनिकतेचा स्वीकार करणारे युवक घडविताना त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संत साहित्य आणि भारतीय दर्शनातील मूलभूत विचार सुलभ आणि आधुनिक माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा केवळ त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान नसून, सत्य, धर्म, कर्तव्य आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भारताच्या महान ज्ञानपरंपरेचा सन्मान आहे, असे राज्यपाल म्हणाले.
वेदांमध्ये निसर्ग, विज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म तसेच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची मंगलकामना वेदांमध्ये आहे. आचार्य आणि विद्वानांनी मौखिक परंपरेच्या माध्यमातून या ज्ञानाचे जतन केले असून, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये संस्कृत विद्यापीठाच्या केंद्रामुळे वेदअध्ययनाला चालना
केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे नाशिक येथे केंद्र सुरू होत असून, यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिल्याची माहिती डॉ. नीलाभ तिवारी यांनी दिली. या केंद्रामुळे नाशिकमधून वेद आणि संस्कृत अध्ययनाची नवी पिढी निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी नाशिकचे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व अधोरेखित केले. नाशिकमध्ये संस्कृत विद्यापीठाचे केंद्र सुरू झाल्यामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून वेदशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नव्या पिढीला मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिष्ठानचे सचिव वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला.
राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विविध मान्यवरांना राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.
वेदाचार्य संतोष कुमार धनपाठी, हैदराबाद यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार, वेदाचार्य महेश रेखे धनपाठी, अहिल्यानगर यांना राष्ट्रीय शुक्ल यजुर्वेद पुरस्कार, वेदाचार्य श्रीकृष्ण श्रौती गुरुजी, चेन्नई यांना राष्ट्रीय सामवेद पुरस्कार, तर वेदाचार्य रामचंद्र जोशी, तिरुपती यांना राष्ट्रीय अथर्ववेद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याशिवाय वेदाचार्य राजेश्वर देशमुख, पुणे यांना राष्ट्रीय शास्त्र पुरस्कार, वेदाचार्य दुर्गादास मुळे यांना राष्ट्रीय यजुर्वेद सेवाव्रती पुरस्कार आणि वेदाचार्य स्व. श्याम सुंदर जोशी यांना राष्ट्रीय यजुर्वेद सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. जोशी यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला.
वेदाचार्य चि. देवव्रत रेखे यांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर दंडक्रम विक्रमादित्य राष्ट्रीय वेद पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांना शाल, मानपत्र आणि २१ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास पुरस्कार समितीचे विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दीपक बागड, योगाचार्य डॉ. विश्वास देवकर, डॉ. कुमार भट्ट, रामगोपाल अय्यर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0