सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारण्याची मागणी – नरेंद्र बनसोडे
सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या सुमारे एक एकर जागेवर संविधान सृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्याची मागणी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
संविधान चौकातील प्रास्ताविकेचे शिल्प पुन्हा स्थापित करण्याची मागणी; पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव
पिंपरी-चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी) : सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविण्याच्या घटनेनंतर सुरू असलेल्या आंदोलनाला आता व्यापक विकासाच्या मागणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सच्या जागेवर भव्य संविधान सृष्टी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.
काँग्रेस आणि समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नववा दिवस होता. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान चौकातील हटविण्यात आलेले प्रास्ताविकेचे शिल्प पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित करावे, तसेच या परिसरात संविधानाची मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
संविधान प्रास्ताविकेचे शिल्प पुन्हा स्थापित करा!
यावेळी नरेंद्र बनसोडे म्हणाले की, संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटवून जेसीबीच्या साहाय्याने स्मारक उद्ध्वस्त करण्यात आल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, संतोष कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
हटविण्यात आलेले संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पुन्हा त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक स्थापित करण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, आंदोलनादरम्यान नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांशी झालेल्या चर्चेतून या परिसरात केवळ प्रास्ताविकेचे शिल्प पुनर्स्थापित करण्यापुरते मर्यादित न राहता व्यापक स्वरूपाचे संविधान स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली आहे.
पीडब्ल्यूडीच्या जागेवर उभारणार संविधान सृष्टी!
सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सची जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून घ्यावी. या जागेतील सुमारे एक एकर क्षेत्रावर भव्य संविधान सृष्टी विकसित करण्यात यावी, अशी मागणी नरेंद्र बनसोडे यांनी केली.
या संविधान सृष्टीमध्ये भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेचे कार्य, संविधानाची मूलभूत मूल्ये, संविधानाची प्रास्ताविका, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि मानवी हक्क यांची माहिती देणारे शिल्प, माहितीफलक आणि शैक्षणिक दालने उभारण्यात यावीत. यामुळे नागरिकांना भारतीय संविधानाचा इतिहास, महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची माहिती मिळण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृहाची सुविधा!
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आणि पिंपळे निलख या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची आवश्यकता आहे.
या परिसरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि स्वतंत्र जागा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त मोठी अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात यावे. या सुविधांचा परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे बनसोडे यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकल्पाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी’ असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा करणार!
या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, कलासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरसचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी जागेची उपलब्धता, प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रकल्पाच्या नियोजनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संविधान जागृती आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न!
संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पुनर्स्थापनेपुरते हे आंदोलन मर्यादित ठेवायचे नाही. या घटनेच्या माध्यमातून सांगवी परिसरात संविधान जागृती, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि सामाजिक प्रबोधनाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि नागरिकांना संविधानाच्या मूल्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने संविधान सृष्टी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारण्याची मागणी करण्यात येत असल्याचे नरेंद्र बनसोडे यांनी स्पष्ट केले.