गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा – मुख्यमंत्री फडणवीस

भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळावा यासाठी गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Aug 27, 2026 - 22:47
 0  5
गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा – मुख्यमंत्री फडणवीस
गणेशोत्सव 2026, देवेंद्र फडणवीस, गणेश मंडळे, प्रसादाची शुद्धता, अन्न व औषध प्रशासन, गणेशोत्सव नियम, गणेश विसर्जन

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. २७ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून भाविकांना देण्यात येणारा प्रसाद शुद्ध आणि भेसळमुक्त असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडळांनी संबंधित नियमांची माहिती घेऊन आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गणेशोत्सव-२०२६ निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला तसेच गणेशोत्सव मंडळांना विविध सूचना केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार पुढे नेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा, शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रशासनासह गणेश मंडळे आणि नागरिकांची आहे.

प्रशासन आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे

गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि उत्तम पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील अडचणी तातडीने दूर करून मंडळांच्या प्रलंबित परवानग्यांचे प्रश्न सोडवावेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जुन्या गणेश मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आगमन-विसर्जन मार्गांवर खड्डे राहू नयेत

विविध महानगरपालिका क्षेत्रांतील गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत तसेच रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. त्यासाठी संबंधित गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

फटाके आणि लाऊडस्पीकरच्या नियमभंगावर कठोर कारवाई

फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात नियमभंग होणार नाही, यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेची पुन्हा पडताळणी

गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सर्व गणेश मंडळांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करावी. विशेषतः मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळांना आवश्यक सूचना देऊन संपूर्ण व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाने मागील वर्षीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे गणेश मंडळांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती समुद्रात किंवा नदीपात्रात विसर्जित होऊन प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून, त्यामध्ये गणेश मंडळांच्या सूचनांचाही समावेश करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील सुमारे १ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलीस किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मोठ्या गणेशमूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग आणि अन्य जोडणी सुरक्षित असल्याची खात्री करावी. आगमन आणि विसर्जनावेळी लहान मुले तसेच भाविकांना मूर्तीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, तसेच मंत्रालय, मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.