आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश; पीएमपीएमएलच्या ९ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹२५ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान
पीएमपीएमएलच्या सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित दिवाळी सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. ३ जून २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मधील सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला दिवाळी सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याच्या खात्यात २५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी ८.३३ टक्के बोनस आणि महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षातील सानुग्रह अनुदानाची रक्कम प्रलंबित राहिल्याने हजारो कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दिवाळीनंतर अनेक महिने उलटूनही अनुदान न मिळाल्याने कामगार कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांनी आणि कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार अमित गोरखे यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार गोरखे यांनी पीएमपीएमएल प्रशासन आणि संचालक मंडळाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून कामगारांची बाजू प्रभावीपणे मांडली.
या प्रयत्नांना यश मिळत प्रशासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे सुमारे ९ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “कष्टकरी कामगार बांधवांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा मला आनंद आहे. कामगारांचे प्रश्न आमच्यासाठी नेहमीच प्राधान्याचे राहिले आहेत. या निर्णयासाठी पीएमपीएमएलचे संचालक मंडळ, प्रशासन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे मी आभार मानतो. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
दरम्यान, अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध कामगार संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत करत आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0