मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी 'अँटोनी लारा रिन्युएबल' यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

Jul 13, 2026 - 19:07
 0  2
मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
मोशी कचरा डेपो, पिंपरी चिंचवड महापालिका, डॉ विजय सूर्यवंशी

पुणे | प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्देश दिले. या बैठकीत महापालिकेच्या पर्यावरण विभागासह संबंधित ठेकेदार कंपनी 'अँटोनी लारा रिन्युएबल' यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा प्रचंड ढिगारा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीत आणि परिसरात मिळून २३ जण अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतः बाहेर पडले, तर बचावपथकाने आणखी नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुर्घटनेनंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबविले.

या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिले असून, चौकशीअंतर्गत संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महापालिकेने या दुर्घटनेतील कारणांचा सर्वंकष तपास करून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, चौकशी अहवालानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0