पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची सज्जता; २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वाटप
मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेची तयारी पूर्ण. शाडू मातीच्या मूर्तिकारांना २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वाटप, विसर्जन मार्गांवरील रस्ते, खड्डे, ड्रेनेज कव्हर्स व वृक्षछाटणीची कामे पूर्ण.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासन सज्ज
मुंबईत श्रीगणेशोत्सव सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध स्तरांवर पूर्वतयारी करण्यात आली आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याबरोबरच मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सन २०२६ साठी शाडू मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना तब्बल २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. शाडू मातीच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक रंगांच्या माध्यमातून गणेशोत्सव अधिक पर्यावरणस्नेही करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
विसर्जन मार्गांवरील अडथळे दूर
गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेने विसर्जन मार्गांवरही विविध कामे पूर्ण केली आहेत.
विसर्जन मार्गांवरील २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. तसेच आगमन आणि विसर्जन मार्गावरील ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
याशिवाय १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.
समुद्रात विसर्जन करताना मत्स्यदंशापासून सावध राहण्याचे आवाहन
गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’ प्रजातींचा वावर आढळून येत असल्याने विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
विसर्जनाच्या वेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सवादरम्यान आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी, विद्युत अपघात, आग लागण्याची घटना तसेच आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच स्वयंसेवकांना प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी तातडीने प्राथमिक मदत करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचे स्वयंसेवक अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे
मुंबई महापालिका प्रशासनाकडून श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या माध्यमातून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असून, सुरक्षित, पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षा आणि पर्यावरणविषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.