कोल्हापुरात नवीन आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना एकाच छताखाली सर्व आधार सुविधा
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने कोल्हापुरात अत्याधुनिक आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे तसेच मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेटसह सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर शहरात अत्याधुनिक नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन केंद्रामुळे नागरिकांना आधारसंबंधित सर्व सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, हे आधार सेवा केंद्र नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, 'डिजिटल इंडिया' अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील. उद्घाटनानंतर त्यांनी स्वतःचे आधार कार्ड अद्ययावत करून घेतले. त्यांचे आधार कार्ड श्रीमती स्मिता माळी यांनी अद्ययावत केले.
शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत सुरू करण्यात आलेले हे आधार सेवा केंद्र आठवड्याचे सातही दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
या केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, आधारमधील आवश्यक दुरुस्ती व अद्ययावत सेवा तसेच ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिले UIDAI आधार सेवा केंद्र म्हणून कोल्हापूरची निवड करण्यात आली असून, १४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील आणखी २७ जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारची आधार सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या अत्याधुनिक केंद्रामध्ये दररोज सुमारे २०० ते २५० नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित विविध सेवांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच आधार सेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, UIDAI प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक मंदार जेवरे, प्रादेशिक व्यवस्थापक निलेश शहाणे, कार्यालयीन व्यवस्थापक मलिकजान मकानदार, महेश शिंदे, श्रीमती अर्चना गंगावणे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0