एमआयडीसी परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमणांवर आयुक्तांचा आढावा; तातडीने उपाययोजनांचे निर्देश

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेत तातडीने संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Apr 15, 2026 - 02:35
 0  1
एमआयडीसी परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमणांवर आयुक्तांचा आढावा; तातडीने उपाययोजनांचे निर्देश
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी, नाले अतिक्रमण, डॉ विजय सूर्यवंशी, जलनिस्सारण, पावसाळा तयारी, PCMC News

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १३ एप्रिल २०२६ : एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सखोल आढावा घेतला.

आयुक्तांनी एमआयडीसी व महापालिका अधिकारी तसेच संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून अतिक्रमित व बुजविलेले नाले तात्काळ ओळखण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी, अन्यथा पर्यायी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत एमआयडीसी परिसरातील जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून उद्योग व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी नाले पूर्वस्थितीत आणणे शक्य नाही, तेथे स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याचे निर्देशही देण्यात आले.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले की, जलनिस्सारण मार्गांवरील अतिक्रमण ही गंभीर बाब असून यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात.

या बैठकीस एमआयडीसीचे अधिकारी, महापालिकेचे विविध विभागप्रमुख तसेच संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0