पिंपरी चिंचवड स्थायी समितीची बैठक; विविध विकासकामांना मंजुरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत रस्ते, स्वच्छता, आरोग्य व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विकासकामांना मंजुरी.

Apr 10, 2026 - 12:44
Apr 10, 2026 - 12:48
 0  6
पिंपरी चिंचवड स्थायी समितीची बैठक; विविध विकासकामांना मंजुरी
PCMC स्थायी समिती,

पुणे प्रतिनिधी: रोहन सोनाळे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.

या बैठकीस स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरण उभारण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक २ मधील मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य कामे, नाल्यांची व पावसाळी चेंबर्सची साफसफाई तसेच चिखली-मोशी भागातील स्वच्छतागृहांच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आला.

प्रभाग क्रमांक ९ मधील नेहरूनगर व खराळवाडी येथे विविध स्थापत्य कामे तसेच प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव येथे रोड फर्निचर दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, साईनगर व कोतवालनगर येथे रस्ते दुरुस्ती व इतर देखभाल कामांना मान्यता देण्यात आली.

रावेत येथील इंद्रप्रभा सोसायटी परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे महापारेषण कंपनीचे १३२ केव्हीचे दोन वीज मनोरे हलविण्यास देखील मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १७ मधील महापालिका इमारतींची दुरुस्ती व वाल्हेकरवाडी येथील रस्ते दुरुस्ती कामांनाही हिरवा कंदील देण्यात आला.

याशिवाय विविध झोपडपट्टी परिसरांमध्ये गटार, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व स्थापत्य दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिका शाळा, दवाखाने व प्रशासकीय इमारतींच्या देखभाल-दुरुस्ती व फर्निचर कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला.

सार्वजनिक शौचालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत GIS आधारित ERP प्रणालीसाठी व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करणे, तसेच विविध रुग्णालयांतील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यासही मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नेत्र रुग्णालयासाठी उपकरण खरेदीलाही मंजुरी देण्यात आली.

तसेच संत तुकाराम महाराज संतपीठासाठी तरतूद, सावित्रीबाई फुले उद्यानातील विद्युत कामे, तसेच विविध जयंती आणि कार्यक्रमांसाठी ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.

सभापतींचे मत

“शहराचा नियोजित आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि झोपडपट्टी भागांतील सुविधा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मंजूर कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत,” असे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0