मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दरगोडे कुटुंबाचे सांत्वन; ४५ लाखांचा धनादेश सुपूर्द

दिंडोरी अपघातानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची दरगोडे कुटुंबाला भेट; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ लाखांची मदत.

Apr 11, 2026 - 03:24
 0  2
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दरगोडे कुटुंबाचे सांत्वन; ४५ लाखांचा धनादेश सुपूर्द
नरहरी झिरवाळ, दिंडोरी अपघात,

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गाव येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दरगोडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

या दुर्घटनेत विहिरीत कार कोसळून ६ शालेय विद्यार्थ्यांसह दोन कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मंत्री झिरवाळ यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या व शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सुमारे ४५ लाख रुपयांचा निधी वारसांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून त्याचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

मंत्री झिरवाळ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कुटुंबीयांना कोणतीही अडचण भासल्यास तात्काळ मदत करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

यावेळी दिंडोरी-पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, हेमंत धात्रक, प्रकाश शिंदे, प्रकाश वडजे, शरद बोडके यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0