इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजना; मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक. पर्यावरणपूरक विकासासाठी ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड | दि. १० एप्रिल २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
या उपक्रमांतर्गत इंद्रायणी व पवना नद्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाणे, घनकचऱ्याची समस्या आणि नदीकाठ संवर्धनाची गरज अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, नाल्यांचे इंटरसेप्शन व डायव्हर्जन, नदीकाठ संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासारख्या उपाययोजना सुचवल्या.
यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मुख्यालय, आकुर्डी येथे आयोजित बैठकीत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना पर्यावरणीय संतुलन राखत विकासकामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि PMRDA चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “इंद्रायणी आणि पवना या नद्या शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडला पर्यावरणपूरक व जलस्वयंपूर्ण शहर बनविण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.”
इंद्रायणी व पवना नद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी ही पाहणी व आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे भविष्यात ठोस निर्णयांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0