आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉटरीद्वारे

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2026, कोल्हापूर आरटीई लॉटरी, RTE admission Maharashtra online, विद्यार्थी प्रवेश लॉटरी, RTE पोर्टल माहिती, शिक्षण हक्क अधिनियम 2009

Apr 10, 2026 - 22:08
 0  5
आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉटरीद्वारे
RTE -2026-27

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के राखीव कोट्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील 315 शाळांमधील एकूण 3361 जागांसाठी 5328 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या शाळांमध्ये उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत, त्या शाळांसाठी शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या वतीने 6 एप्रिल रोजी राज्यस्तरावर ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली.

या लॉटरी प्रक्रियेद्वारे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तसेच पुढील फेऱ्यांसाठी प्रतीक्षा यादी निश्चित करण्यात आली असून ती RTE पोर्टलच्या होमपेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या नावासह मोबाईलवर संदेश पाठविण्यात येणार आहेत. तरीही पालकांनी केवळ संदेशावर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील "Application Wise Details" किंवा "Selected Waiting List" या पर्यायांमध्ये जाऊन आपल्या अर्ज क्रमांकाद्वारे खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी RTE पोर्टलवरील Allotment Letter घेऊन प्रथम पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी. त्यानंतर पडताळणी समितीने दिलेल्या प्रवेश निश्चितीच्या पावतीसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

नियत कालावधीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. तसेच ज्यांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे, त्यांच्यासाठी पुढील प्रवेश फेरी जाहीर करण्यात येणार आहे. पालकांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0