खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे महा-मॉकड्रिल यशस्वी; आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी
खामगाव एमआयडीसीमध्ये एलपीजी गॅस गळतीवरील भव्य मॉकड्रिल यशस्वीपणे पार पडली. विविध यंत्रणांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासनाची आपत्ती सज्जता सिद्ध झाली.
बुलढाणा प्रतिनिधी— महेंद्र मिश्रा
बुलढाणा, दि. 9 : औद्योगिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या संभाव्य रासायनिक आपत्तींसाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची प्रात्यक्षिक चाचणी खामगाव एमआयडीसी येथे आज घेण्यात आली. ‘वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि.’ येथे एलपीजी गॅस गळती संदर्भातील भव्य मॉकड्रिल (रंगीत तालीम) यशस्वीरित्या पार पडली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दुपारी 11:30 वाजता कंपनीच्या टँकर लोडिंग परिसरात गॅस गळती झाल्याचा काल्पनिक प्रसंग निर्माण करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर काही मिनिटांतच जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन अधिकारी नागेश रोठे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ‘वॉटर कर्टन’ तयार करून हवेतील गॅस विरळ केला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात नाकेबंदी करण्यात आली. संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणने तातडीने वीजपुरवठा खंडित केला.
कंपनीच्या आपत्कालीन आराखड्यानुसार सायरन वाजवून कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. संपूर्ण मोहिमेचा समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अमर पुरुषोत्तम भोगे यांनी केला.
या मॉकड्रिलमध्ये अन्न व औषध प्रशासन, महसूल विभाग, महावितरण, पोलीस व इतर संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या सरावामुळे आपत्ती काळात विविध विभागांमधील समन्वय, तत्परता आणि कार्यक्षमता यांची प्रभावी चाचणी झाली असून, जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेचा ठसा उमटला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0