काशी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा गाजीपूरमध्ये अपघात; बुलढाणा-अकोल्यातील दोन महिलांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे काशी दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात होऊन बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील दोन महिलांचा मृत्यू, तर 38 जण जखमी झाले.
बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा
बुलढाणा, दि. 9 : काशी विश्वनाथ दर्शनासाठी नेपाळकडे निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सुमारे 38 भाविक जखमी झाले आहेत.
ही घटना वाराणसी-गोरखपूर महामार्गावरील नंदगज (गाजीपूर) येथे 9 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता घडली. ‘जय श्रीराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स’तर्फे आयोजित यात्रेत महाराष्ट्रातील भाविक अयोध्या व इतर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघाले होते.
अपघातात अकोला येथील 50 वर्षीय अन्नपूर्णाबाई तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा मृत्यू झाला. उर्वरित 35 ते 38 यात्रेकरू जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर आहे.
अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तत्काळ उत्तर प्रदेश सरकार व स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. जखमींना तात्काळ व सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच गाजीपूरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार व सीएमओ डॉ. सुनील पांडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीचे निर्देश देण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांचे सहाय्यक खाजगी सचिव डॉ. गोपाल डिके व आचल भाटिया हे घटनास्थळी मदतीसाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान, दिल्ली येथील मंत्रालयातूनही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून, अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0