मराठी उपासक परीक्षेचा दबदबा; २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण, राजापूर-लोह शिंगवे येथे पदवी सोहळा

नाशिक जिल्ह्यात ‘मराठी उपासक’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद; ७५ शाळांतील २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण, पदवी सोहळा उत्साहात.

Apr 11, 2026 - 03:34
 0  2
मराठी उपासक परीक्षेचा दबदबा; २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण, राजापूर-लोह शिंगवे येथे पदवी सोहळा
मराठी उपासक परीक्षा, नाशिक शिक्षण

नाशिक जिल्ह्यात वाचन संस्कार रुजवण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मराठी उपासक’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, सुमारे ७५ शाळांमधील तब्बल २५ हजार विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

कुसुमाग्रज मराठी विचार मंच यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात अध्यक्ष सतीश प्रेमचंद बोरा यांनी बोलताना, “सुदृढ, स्वाभिमानी आणि सजग समाज घडवण्यासाठी वाचन संस्कार अत्यावश्यक आहेत,” असे मत व्यक्त केले.

मराठी भाषेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आजवर सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी ‘मराठी उपासक’ परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली असून हा उपक्रम आता चळवळीचे रूप घेत आहे.

तालुक्यातील राजापूर (येवला) आणि लोह शिंगवे (नांदगाव) येथे पदवी प्रदान सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. या ठिकाणी सुमारे २०० विद्यार्थ्यांना ‘मराठी उपासक’ पदवी प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास समाजसेवक जगन्नाथ काशिनाथ साळुंके, उद्योगपती नरेंद्र कचरदास पारख, संचालक संपत वाघ व रमेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बारवकर यांनी प्रास्ताविक केले, तर सरचिटणीस सुभाष सबनीस यांनी आभार मानले. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या राजापूर येथील विद्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक संपत वाघ, रमेश वाघ आणि मुख्याध्यापक आर. बी. काकड यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट:

विद्यार्थ्यांमध्ये भाषेची ओढ निर्माण करून मराठीचा जागर घराघरात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0