इंडियन स्किल स्पर्धेतील विजेत्यांना विशेष रोख पुरस्कारांची घोषणा; कौशल्य विकासाला नवे बळ
इंडियन स्किल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कारांची घोषणा; सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपये देण्याचा निर्णय.
मुंबई, दि.१० : इंडियन स्किल स्पर्धेतील पदक विजेत्यांना विशेष रोख पुरस्कार देण्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात मंत्री लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि ‘कौशल्याचार्य’ पुरस्कार विजेत्या शिल्पनिदेशकांचाही गौरव करण्यात आला.
मंत्री लोढा म्हणाले की, राज्यातील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना असून, प्रशिक्षण, मेंटरशिप आणि मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांवर शासन मदत करणार आहे.
अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले की, राज्यातील ११०० हून अधिक आयटीआय संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. आयओटी, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही आणि व्हाईट वेल्डिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस’ उभारण्यावर भर दिला जात आहे.
कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी ‘रील टू रियल टाइम’ आणि ‘लर्निंग विथ अर्निंग’ या संकल्पनांवर भर देत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील २२ विजेते, डिपेक्स स्पर्धेतील १३ विजेते तसेच विविध आयटीआय संस्थांना पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत राज्याचे नाव उंचावले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0