आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी-श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग
आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य दिंडी, वारकरी-श्रमिक मेळावा आणि सांगता सोहळा उत्साहात पार पडला. हजारो वारकरी, श्रमिक आणि नागरिकांनी सहभाग घेत भक्ती, समता व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २५ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य दिंडी सोहळा, वारकरी-श्रमिक मेळावा आणि सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अबोलीताई पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना भक्त पुंडलिकाच्या आदर्शाचे स्मरण केले. "आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. प्रत्येकाने पुंडलिकाचा आदर्श आचरणात आणावा," असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. वारकरी संप्रदायाने समाजाला प्रेम, बंधुभाव आणि मानवतेची शिकवण दिली असून हीच शिकवण श्रमिकांपर्यंत पोहोचावी, श्रमिकांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे आणि संत विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत जावा, या उद्देशाने दिंडीचे आयोजन करण्यात आले.
संत तुकाराम नगर येथील पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ झाला. मेहशानगर, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गंगानगर परिसरातून सुमारे तीन किलोमीटर पायी मार्गक्रमण करत दिंडीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, मारुती मंदिर आणि शनी मंदिर मार्गे आचार्य अत्रे रंगमंदिर गाठले. तेथे वारकरी-श्रमिक मेळाव्याने सोहळ्याची सांगता झाली.
संपूर्ण दिंडीदरम्यान "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. पारंपरिक वेशभूषेतील वारकरी अभंग गात, फुगड्या खेळत आणि नृत्य करत पुढे सरकत असल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुशोभित रथ. या रथामध्ये विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांच्या वेशभूषेत सजलेली लहान मुले विराजमान झाली होती. मार्गावरील नागरिकांनी फुलांचा वर्षाव, रांगोळ्या आणि टाळ्यांच्या गजरात दिंडीचे उत्साहाने स्वागत केले.
दिंडीचे संपूर्ण नियोजन यशवंतभाऊ भोसले यांनी स्वतः लक्ष घालून केले. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत, वाहतूक नियोजन, शिस्त आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली. संपूर्ण मार्गावर ते स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिंडीतील प्रत्येक घटक सुरळीत पार पडावा यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह केलेली धावपळ उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरली.
मेळाव्यात मान्यवरांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व, वारकरी परंपरेचे संस्कार आणि श्रमिकांचे समाजातील योगदान यावर भाष्य केले. तसेच यशवंतभाऊ भोसले यांच्या सामाजिक, धार्मिक आणि कामगार चळवळीतील सातत्यपूर्ण कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओमकार देशपांडे, ओंकार जोखारे, अप्पू नायर, अंकुश वाघमारे, मानसी देशपांडे, आरतीताई पराळे, इस्मात भाभी सय्यद, शालन महापुरे, संतोषी चौधरी, गणेश बुलदगड, विनायक निकम, श्रेयस करे, मल्लेश पोरवी, फौजदार गायकवाड, आप्पासाहेब माने, महेश भुते, सुधाकर शिंदे, सतीश सासवडे तसेच संत तुकाराम नगर सहकारी रचना मर्यादितच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासदांनी मोलाचे योगदान दिले.
भक्ती, सेवा, समता आणि श्रमिक ऐक्याचा संदेश देणारा हा भव्य दिंडी सोहळा पिंपरी-चिंचवडकरांच्या स्मरणात राहणारा उत्सव ठरला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0