सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांची क्षमता वाढविण्यासाठी ‘शक्ती अँड सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाची पुण्यात सुरुवात
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) पुढाकारातून पुण्यात महाराष्ट्र पोलिसांसाठी ‘शक्ती अँड सुरक्षा : पोलिसिंग अगेन्स्ट सायबर क्राईम’ क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिला सुरक्षेसाठी संवेदनशील, तंत्रज्ञानाधारित आणि डेटा-केंद्रित पोलिसिंगची गरज असल्याचे अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले.
मेघना कदम:
पुणे, दि. 27 : राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) पुढाकारातून महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शक्ती अँड सुरक्षा : पोलिसिंग अगेन्स्ट सायबर क्राईम’ या क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे पुण्यात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, महिलांची सुरक्षितता हीच सुशासनाची खरी ओळख आहे. त्यामुळे महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी लिंगसंवेदनशील (Gender-Sensitive), पीडित-केंद्रित (Victim-Centric) दृष्टिकोन स्वीकारत तातडीने आणि प्रभावी कारवाई करणे आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित गुन्हे, डीपफेक (Deepfake), डिजिटल ब्लॅकमेल आणि सतत बदलणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांना प्रभावीपणे रोखण्यासाठी पोलिसांनी सातत्याने नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. भविष्यातील पोलिसिंग ‘माइंड पॉवर, मशीन पॉवर आणि डेटा पॉवर’ या त्रिसूत्रीवर आधारित असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोगाच्या महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या सहा टप्प्यांच्या विशेष प्रशिक्षण मालिकेचा प्रारंभ असून, या माध्यमातून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षेतील आधुनिक तंत्रज्ञान, तपास कौशल्ये आणि महिलांवरील सायबर गुन्ह्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधातील क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विशेषतः महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2