चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर प्रतिसाद; दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

महाराष्ट्रात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कोकणातील शाळांना भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यांचा आढावा घेतला.

चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर प्रतिसाद; दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट
चला शाळेत जाऊया अभियान, दादाजी भुसे, महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग, कोकणातील शाळा, शैक्षणिक गुणवत्ता, शाळा पायाभूत सुविधा, विद्यार्थी अध्ययन कौशल्ये, शालेय शिक्षण, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, महाराष्ट्र शिक्षण बातम्या

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांचा आढावा

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट; विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यांसह पायाभूत सुविधांची केली पाहणी

मुंबई, दि. १० ऑक्टोबर २०२६ : राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पालक अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकारी शाळांना प्रत्यक्ष भेटी देत असून, शालेय प्रशासनातील सकारात्मक बाबी, अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेत आहेत.

दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान कोकण विभागातील विविध शाळांना भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडुरंगशेठ पडते, पडतेवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खारेपाटण क्रमांक १; रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, पानवल, होरंबेवाडी आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, झरेवाडी; तसेच रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, आदिवासीवाडी आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, झिरड येथे त्यांनी भेट देऊन शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि अध्ययन कौशल्यांची तपासणी करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांसह ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य

शालेय शिक्षण विभागाचे ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून शाळांमध्ये पायाभूत सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना, सामाजिक मूल्ये आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

शाळांमधील निर्लेखनास पात्र असलेल्या साहित्याचे नियमानुसार तातडीने निर्लेखन करून शाळा परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.

५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान अभियान

मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींचा आढावा घेणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या अभियानासाठी विविध जिल्ह्यांकरिता शालेय शिक्षण विभागातील सहसंचालक आणि उपसंचालक यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि डिजिटल सुविधांची तपासणी

शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, वाचन व लेखन कौशल्ये आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती यांचा आढावा घेतला जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्थिती, वर्गखोल्या, शाळा परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, संरक्षक भिंत, वीजपुरवठा आणि आवश्यक फर्निचर यांची पाहणी करण्यात येत आहे.

डिजिटल व ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता आणि वितरण यांचीही प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे.

शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि उपलब्ध सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांचाही आढावा घेतला जात आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट शाळांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित शालेय वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानांतर्गत उपाययोजना सुनिश्चित केल्या जात आहेत.

शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन आवश्यक सुधारणा करण्यास या अभियानामुळे मदत होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शालेय सुविधांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.