पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यात हरित महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ; दरवर्षी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आजरा तालुक्यातील मसोली येथे झाला. जिल्ह्यात दरवर्षी ५ लाख वृक्ष लागवड करण्याचे आणि पुढील २१ वर्षांत १ कोटी ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Jul 13, 2026 - 19:36
 0  6
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यात हरित महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ; दरवर्षी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
हरित महाराष्ट्र अभियान, प्रकाश आबिटकर, कोल्हापूर, वृक्षलागवड,

कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. १३ : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज आजरा तालुक्यातील मौजे मसोली येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर वृक्षलागवडीला व्यापक आणि शाश्वत स्वरूप देण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी ५ लाख वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील २१ वर्षांत तब्बल १ कोटी ५ लाख वृक्षांची लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करताना, वृक्षलागवड ही केवळ संख्येची पूर्तता न राहता प्रत्येक रोप जगले पाहिजे, त्याची योग्य जोपासना झाली पाहिजे आणि जिल्ह्याचे हरित क्षेत्र वाढले पाहिजे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगितले.

राज्यात यंदा १८ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक सहभाग, ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन आणि विविध विभागांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर आणि स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन आणि जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेसाठी आवश्यक सर्व रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.