पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १० वर्षांपासून फरार बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने १० वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपीला कर्नाटकातून अटक केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

Jul 22, 2026 - 23:42
 0  8
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १० वर्षांपासून फरार बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद
पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक, पोक्सो प्रकरण, बलात्कार प्रकरण, फरार आरोपी, कर्नाटक अटक,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने १० वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कार व पोक्सो (POCSO) प्रकरणातील आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक करून मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

निगडी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्ह्यातील आरोपी हनुमंत दुर्गप्पा कुंभार (वय ३४) हा गेल्या दहा वर्षांपासून फरार होता. गुन्ह्यानंतर तो कर्नाटकात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे यांनी मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठावठिकाणा निश्चित केला. त्यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहितदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पथकाने कर्नाटक राज्यातील कुरगुंड (ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी) येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

तांत्रिक तपासामुळे मिळाले यश

दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त माहिती, मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक पातळीवरील पडताळणी यांचा प्रभावी वापर केला. या समन्वित तपासामुळे आरोपीला अखेर अटक करण्यात यश आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहितदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि निलेश जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे दीर्घकाळ फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधातील शोधमोहीम अधिक प्रभावीपणे सुरू असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0