थेरगावमध्ये भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारणीला वेग; सभापती अभिषेक बारणे यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा
थेरगाव येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहे. सभापती अभिषेक बारणे यांनी कामाची पाहणी केली. महात्मा फुले योजनेअंतर्गत गरीबांना मोफत किंवा स्वस्त उपचार मिळणार.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
थेरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करत आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कर्करोगावर परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे.
३० एप्रिल रोजी झालेल्या पाहणी दौऱ्यात सभापती अभिषेक बारणे यांनी हॉस्पिटल परिसरातील पार्किंग व्यवस्था, सुरक्षा सुविधा, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, पाणी पुरवठा व्यवस्था तसेच स्वच्छतेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची गुणवत्ता, गती आणि रुग्णहिताच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.
या दौऱ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. मुसलगी, डॉ. सोनेकर, डॉ. कुलकर्णी यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. येथे लिनियर ॲक्सिलरेटर, ब्रॅकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनर यांसारखी आधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, कोलोरेक्टल कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या आजारांवर विशेष उपचार येथे उपलब्ध होणार आहेत.
तसेच केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, समुपदेशन आणि पुनर्वसन या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
विशेष म्हणजे, या रुग्णालयातील उपचार शुल्क महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांशी सुसंगत ठेवले जाणार असल्याने गोरगरीब रुग्णांना अत्यंत कमी दरात किंवा मोफत उपचार मिळणार आहेत.
याच वेळी थेरगाव हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे निष्कलंक सेवा बजावणारे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
थेरगावमधील या भव्य कॅन्सर हॉस्पिटलमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0