मविप्र संशोधकांच्या ‘स्मार्ट पेन’ला भारत सरकारचे पेटंट; त्वरित भाषांतराची नवी क्रांती
नाशिकच्या मविप्र संशोधकांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट पेन’ला भारत सरकारचे पेटंट; मराठी, हिंदी, इंग्रजीत त्वरित भाषांतर शक्य.
नाशिक ब्यूरो
नाशिक येथील मविप्र संस्था च्या संशोधकांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट लिंग्विस्टिक लर्निंग पेन’ या नाविन्यपूर्ण उपकरणाला भारत सरकार पेटंट विभाग यांच्याकडून अधिकृत पेटंट (डिझाइन क्रमांक 484801-001) प्राप्त झाले आहे. या पेटंटची नोंदणी १ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, या शोधामुळे शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः भाषांतराच्या क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या अत्याधुनिक उपकरणाच्या निर्मितीत इगतपुरी येथील गोवर्धने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांच्यासह प्रा. अर्जुन शाहू, डॉ. दिनकर नेरपगार, डॉ. हेमंत धाडे आणि डॉ. अंजना तिवारी (भोपाळ) यांच्या संशोधन टीमचा मोलाचा वाटा आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक अॅड. संदीप गुळवे व इतर पदाधिकाऱ्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
असे काम करते स्मार्ट पेन:
हे पेन अत्याधुनिक स्कॅनिंग तंत्रज्ञानावर आधारित असून, कोणत्याही पुस्तकातील मजकुरावर पेन फिरवले असता त्या ओळी त्वरित स्कॅन होतात. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परभाषेतील मजकूर समजण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भाषांतराची नवी क्रांती:
या पेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये त्वरित भाषांतर करण्याची क्षमता. इंग्रजी किंवा हिंदीतील मजकूर मराठीत सहज समजेल, तर भाषेची अडचण शिक्षणात अडथळा ठरणार नाही.
जागतिक स्तरावर विस्ताराची क्षमता:
भविष्यात या पेनमध्ये विविध प्रादेशिक तसेच जागतिक भाषांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांपर्यंत सर्वांसाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या संशोधनामुळे नाशिक जिल्हा आणि मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हे पेन दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0