पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद; शिवरायांचा जिवंत इतिहास रंगमंचावर
महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाणता राजा’ महानाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर झालेल्या या भव्य प्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा भव्य पट उलगडण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २ मे २०२६ – महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन या तिन्ही महत्त्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जाणता राजा’ या भव्य महानाट्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर रंगलेल्या या ऐतिहासिक महानाट्याने शिवरायांचा जिवंत इतिहास प्रेक्षकांसमोर उभा केला.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणकारी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या महानाट्यामागे आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र दिन हा राज्याच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि प्रगतीचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे. जागतिक कामगार दिन आपल्याला कष्टकरी वर्गाच्या योगदानाची जाणीव करून देतो, तर मराठी राजभाषा दिन मातृभाषेच्या गौरवाची आठवण करून देतो. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणाची प्रेरणा देते. ‘जाणता राजा’सारख्या महानाट्याच्या माध्यमातून ही प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
आमदार उमा खापरे यांनी सांगितले की, ‘जाणता राजा’ महानाट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास अनुभवण्याची संधी मिळाली. शिवरायांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि जनकल्याणकारी विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी कष्टकरी वर्गालाही सलाम केला.
दरम्यान, महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आशिया खंडातील नामांकित ‘जाणता राजा’ महानाट्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा भव्य, जिवंत आणि प्रेरणादायी पट उलगडला.
शेकडो कलाकार, नेत्रदीपक नेपथ्य, वास्तवदर्शी युद्धदृश्ये, पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी प्रकाशयोजना यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्वराज्याची स्थापना, आदर्श शासनव्यवस्था, शौर्य, कर्तृत्व आणि जनकल्याणकारी दृष्टिकोन यांचे प्रभावी चित्रण या महानाट्यातून करण्यात आले. त्यामुळे ‘जाणता राजा’ हा केवळ नाट्यप्रयोग न राहता एक संस्कारमंच ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0