मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार; बीडीडी चाळीतील ५५७ रहिवाशांना घरांच्या चाव्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पात्र रहिवाशांना नव्या घरांचे वितरण. तिन्ही प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार; बीडीडी चाळीतील ५५७ रहिवाशांना घरांच्या चाव्या
BDD Chawl Redevelopment, Mumbai Housing, MHADA News, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sunetra Pawar, Na M Joshi Marg, Lower Parel, BDD Chawl Homes, Mumbai Redevelopment

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील १५,८०४ पुनर्वसन सदनिकांचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुंबईची संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही. बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मूळ मुंबईकर आणि अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच ठिकाणी मोठे, प्रशस्त आणि हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ पात्र रहिवाशांना सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या आणि ताबा पत्रांचे वाटप करण्यात आले.

तीन बीडीडी चाळ प्रकल्पांतील १५,८०४ घरांचे काम २०२९ पर्यंत पूर्ण होणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नायगाव, ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ आणि वरळी या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील एकूण १५ हजार ८०४ पुनर्वसन सदनिकांचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकासकांऐवजी म्हाडामार्फत करण्याचा निर्णय घेतल्याने आशियातील नागरी पुनरुत्थानाचा मोठा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत आहे.

बीडीडी चाळींना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक यांचे वास्तव्यही या चाळीत होते. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करत रहिवाशांना दर्जेदार घरे देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

बीडीडी चाळीतील अनेक कुटुंबे सुमारे १६० चौरस फुटांच्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या घरांमध्ये दोन ते तीन पिढ्यांसह राहत होती. या रहिवाशांना बैठक खोली, दोन शयनकक्ष आणि आवश्यक सुविधांनी युक्त अशी ५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही घरे पुढील पिढ्यांसाठीही भक्कम आधार ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बीडीडी चाळींमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या सन २०११ पूर्वीच्या पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपयांत घरे देण्याचा निर्णय कायम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सन २०११ नंतरच्या कटऑफमुळे पात्र न ठरणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रकरण म्हणून बांधकाम खर्चात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत निर्माण झालेल्या किमतीसंबंधी तफावती आणि अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नव्या घरांच्या चाव्या मिळाल्यानंतर रहिवाशांनी ही घरे विकण्याऐवजी कुटुंबाची संपत्ती आणि पुढील दोन-तीन पिढ्यांचा वारसा म्हणून जतन करावीत, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पुनर्विकास प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. पुनर्वसन सदनिकांच्या दर्जात किंवा नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पुनर्वसनासाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकाही विक्रीसाठीच्या उच्च दर्जाच्या घरांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आणि सुविधांनी परिपूर्ण असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवाशांना केवळ घरच नव्हे, तर मोकळ्या जागा, उद्याने, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याची जागा यांसह एकूण २३ प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य शासन कार्यवाही करेल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने विकास नियंत्रण नियमावलीत आवश्यक बदल करून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. नागरिकांना घरांसोबतच प्रलंबित भाडे मिळावे, यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईकरांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा आणि मोकळ्या जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेसकोर्सची १२५ एकर आणि कोस्टल रोडलगतची सुमारे १५० एकर जागा मिळून जवळपास ३०० एकरांवर जागतिक दर्जाचे खुले उद्यान विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली.

५५७ कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हक्काच्या नव्या घरात प्रवेश करण्याची संधी मिळणे हा बीडीडी चाळवासीयांसाठी दुहेरी आनंदाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

मुंबईच्या उभारणीत योगदान देणारे कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनमानाचा विचार करून विकास झाला पाहिजे. नव्या घरात प्रवेश करणाऱ्या कुटुंबांनी मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

इमारती बदलल्या तरी बीडीडी चाळींच्या संस्कृतीतील आपुलकी, परस्पर सहकार्य, सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा आणि माणुसकीचा वारसा कायम जपावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वरळीतील नागरी सुविधांना गती देण्याची मागणी

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या प्रकल्पामुळे म्हाडाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत झाली असून, कामाठीपुरा आणि उमरखाडी पुनर्विकास प्रकल्पांसाठीही हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

वरळी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. फेमस स्टुडिओ परिसरातून ना. म. जोशी मार्गाकडे जोडणारा उड्डाणपूल उभारल्यास नागरिकांना सात रस्ता आणि आर्थर रोड नाक्याला वळसा घालण्याची गरज भासणार नाही. या प्रस्तावासाठी मुंबई महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

तिन्ही बीडीडी चाळ प्रकल्पांत आतापर्यंत ३,९३३ सदनिकांचे वितरण

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, नायगाव, ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ आणि वरळी या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ३ हजार ९३३ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. तिन्ही प्रकल्पांतील सर्व पुनर्वसन सदनिकांचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल. वरळी पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे १२०० घरे जून २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत सन २०३० पर्यंत ७.५० लाख घरे उभारण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील शिंदे, आमदार मनिषा कायंदे, शायना एनसी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद बोरीकर यांनी आभार व्यक्त केले.