‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’द्वारे उमेदवार आणि उद्योगांची सांगड; रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी राज्याचा पुढाकार
महाराष्ट्रात ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ उपक्रमाद्वारे उमेदवार आणि उद्योगांना जोडण्याचा शासनाचा प्रयत्न. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत एकस्टेप फाउंडेशन व एनएसडीसीसोबत सामंजस्य करार.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती; एकस्टेप फाउंडेशन आणि एनएसडीसीसोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आणि उद्योगांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबई उपनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
या उपक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि एकस्टेप फाउंडेशन यांच्यात बिगर-वित्तीय सामंजस्य करार करण्यात आला. तसेच राज्यातील कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी विभागाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत (NSDC) सामंजस्य करार केला. हे करार मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने रोजगाराची सांगड
‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी (MSME) जोडण्याचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांकडील कौशल्ये आणि उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सांगड घालून रोजगार शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार आहे.
एकस्टेप फाउंडेशनने विकसित केलेला हा उपक्रम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या तत्त्वांवर आधारित आहे. व्यक्तींच्या गरजा आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक अर्थव्यवस्थेतील रोजगाराची मागणी आणि उपलब्ध मनुष्यबळाचा शोध घेण्यास या व्यासपीठाची मदत होणार आहे.
उपजीविका, शिक्षण व प्रशिक्षण, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक सहभाग या क्षेत्रांचाही या उपक्रमात समावेश आहे. नागरिक, उद्योजक, उद्योग आणि विविध संस्थांना एकमेकांशी जोडून स्थानिक कौशल्ये, संसाधने आणि आर्थिक संधींचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई उपनगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रायोगिक प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे या उपक्रमाचा राज्यभर विस्तार करण्याची शक्यता तपासली जाईल. प्रकल्पासाठी निधीची तरतूद प्रस्तावित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार कौशल्यविषयक योजनांचे मूल्यमापन, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास, भविष्यकालीन कौशल्य प्रशिक्षण, उद्योगसंलग्न प्रशिक्षण आणि महिला उद्योजकता या क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे.
मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ सुरू करण्यात येणार असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांत जागतिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.
एआय, रोबोटिक्स आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण
उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा विश्लेषण यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेदवारांना जर्मन, जपानी आणि इंग्रजी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच परदेशी नियोक्त्यांशी समन्वय साधून उमेदवारांना आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.
उद्योगसंलग्न कौशल्य परिसंस्था आणि शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यावरही भर दिला जाणार आहे. महिला उद्योजकांना बाजारपेठ, डिजिटल वाणिज्य, आर्थिक साक्षरता आणि मार्गदर्शनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत.
वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या सामंजस्य करारांच्या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. अमित सैनी, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, उपसचिव वैशाली सुळे, कौशल्य आयुक्तालयाचे उपआयुक्त सचिन जाधव, एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार पिल्लई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा सहायक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि एकस्टेप फाउंडेशनचे कार्यक्रम संचालक इकप्रित सिंग उपस्थित होते.