मुंबईत कचरा टाकताच ‘एआय कॅमेरा’ देणार स्वच्छतेचा संदेश; माहीममध्ये पालिकेचा अभिनव प्रयोग

मुंबई महापालिकेचा एआय तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छता उपक्रम सुरू. माहीम येथील गजानन वाटिका परिसरात कचरा टाकणाऱ्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेचा संदेश देणारा कॅमेरा बसविण्यात आला आहे.

मुंबईत कचरा टाकताच ‘एआय कॅमेरा’ देणार स्वच्छतेचा संदेश; माहीममध्ये पालिकेचा अभिनव प्रयोग
मुंबई महापालिका, BMC AI Camera, माहीम गजानन वाटिका, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय कॅमेरा, कचरा व्यवस्थापन, मुंबई स्वच्छता अभियान, Garbage Vulnerable Points, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, अश्विनी भिडे, मुंबई बातम्या

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

गजानन वाटिका परिसरात प्रायोगिक उपक्रम; कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. कचरा साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी एखादी व्यक्ती येताच कॅमेऱ्याद्वारे तिच्या हालचाली टिपल्या जातात आणि ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जातो. मुंबईतील माहीम येथील गजानन वाटिका परिसरात हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

कॅमेऱ्यात हालचाल टिपताच स्वच्छतेची उद्घोषणा

मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांना ‘गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स’ (Garbage Vulnerable Points – GVPs) असे संबोधले जाते. अशा ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाने माहीम येथील गजानन वाटिका परिसरात एआय आधारित कॅमेरा बसविला आहे.

या कॅमेऱ्यासोबत ध्वनिक्षेपक जोडण्यात आले आहेत. कचरा टाकण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित ठिकाणी आल्यास कॅमेरा तिच्या हालचाली टिपतो. त्यानंतर ध्वनिक्षेपकाद्वारे तत्काळ उघड्यावर कचरा न टाकण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जाते.

या यंत्रणेमुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यापासून परावृत्त करणे आणि त्या ठिकाणी पुन्हा कचरा साचू न देणे, हा प्रमुख उद्देश आहे.

नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न

सार्वजनिक स्वच्छतेसाठी केवळ कचरा उचलणे पुरेसे नसून, नागरिकांच्या सवयींमध्येही बदल होणे आवश्यक आहे. याच विचारातून महानगरपालिकेने तंत्रज्ञानाधारित हा प्रयोग सुरू केला आहे.

एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून तत्काळ संदेश दिल्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच, कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे स्वच्छ ठेवणे आणि अशा ठिकाणी पुन्हा अस्वच्छता निर्माण होऊ न देणे, यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या पुढाकाराने माहीममधील हा प्रायोगिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

प्रयोगाच्या यशानंतर मुंबईतील अन्य ठिकाणीही विस्तार

माहीम येथील प्रयोगाच्या परिणामकारकतेचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील इतर ठिकाणीही अशा प्रकारची यंत्रणा बसविण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. या तंत्रज्ञानामुळे कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे नियंत्रित ठेवण्यास आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, नागरिकांनी रस्त्यांवर, उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा अन्यत्र कुठेही कचरा टाकू नये. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.