मुंबईतील कचरा साचणारी ठिकाणे हटविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
मुंबईतील कचरा साचण्याची २८६ संभाव्य ठिकाणे शोधण्यात आली असून, त्यापैकी १०२ ठिकाणे हटविण्यात आली आहेत. उर्वरित ठिकाणांवर उपाययोजना, सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण, बांधकाम राडारोड्याचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबईतील कचरा साचणारी ठिकाणे हटविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (Garbage Vulnerable Points – GVPs) निष्कासित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण, बांधकाम व पाडकामातील राडारोड्याचे योग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
मुंबईतील स्वच्छतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबद्ध आहे. स्वच्छतेच्या व्यवस्थेत लवकरात लवकर प्रत्यक्ष आणि दृश्य स्वरूपात बदल दिसून यावेत, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑक्टोबर रोजी वरळी येथील महानगरपालिकेच्या कमांड सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित कामांना गती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
मुंबईतील २८६ कचरा साचण्याची ठिकाणे शोधली; १०२ हटविली
मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे ओळखून त्यांचे नकाशांकन करावे आणि या ठिकाणांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.
पहिल्या टप्प्यात मुंबईत एकूण २८६ कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (GVPs) शोधण्यात आली आहेत. त्यापैकी १०२ ठिकाणे निष्कासित करण्यात आली आहेत. उर्वरित ठिकाणांवरही प्रभावी कार्यवाही करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी कचरा साचण्यामागील कारणांचे विश्लेषण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
कचरा हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये, यासाठी नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५५ सुका कचरा वर्गीकरण केंद्रांपैकी ४६ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये दररोज सुमारे १३७.३२ मेट्रिक टन सुका कचरा संकलित होतो.
सुका कचरा संकलन, वर्गीकरण आणि पुनर्चक्रणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी या केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रांमधील उपलब्ध सुविधा, कचरा हाताळण्याची व्यवस्था आणि कचऱ्याच्या नोंदींची अचूकता यांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.
दररोज ८,५०० मेट्रिक टनांपेक्षा अधिक बांधकाम राडारोडा
मुंबईत दररोज ८,५०० मेट्रिक टनांपेक्षा अधिक बांधकाम व पाडकामातील राडारोडा (C&D Waste) निर्माण होतो. या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या दोन प्रकल्पांमधून एकूण १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन प्रक्रिया क्षमता उपलब्ध आहे.
राडारोड्याचे उगमस्थळी वर्गीकरण, अधिकृत पद्धतीने वाहतूक आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.
राडारोड्याच्या वाहतुकीवर डिजिटल प्रणालीद्वारे देखरेख ठेवणे, संबंधित प्रकल्पस्थळांची नोंदणी करणे आणि आवश्यक नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.
सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करा
मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व नळजोडणी, आवश्यक दुरुस्ती आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधांची उपलब्धता याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
स्वच्छतागृहांची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे वेगाने पूर्ण करावीत. तसेच नवीन व आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रस्तावित कामांचा नियोजनबद्ध आढावा घेऊन त्यांची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी संबंधित विभागांनी पाठपुरावा करावा, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या कामांचे नियमित निरीक्षण करण्याचे निर्देश
मुंबईतील स्वच्छता व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी संबंधित विभागांनी कामांचे नियमित निरीक्षण करावे, प्रलंबित उपाययोजनांचा आढावा घ्यावा आणि निश्चित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या.
कचरा साचणारी ठिकाणे हटविणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन करणे आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधा सुधारणे या बाबींवर भर देत मुंबईतील स्वच्छता व्यवस्थेत ठोस सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे.