चेंबूर पोलिसांची मोठी कारवाई; हस्तिदंत तस्करी प्रकरणी ५ जणांना अटक, ३.५० कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबईतील चेंबूर पोलिसांनी हस्तिदंत तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करत ५ आरोपींना अटक केली. पोलिसांनी ३ कोटी ५० लाख रुपयांचा हस्तिदंत व मोबाईल जप्त केला असून वन्यजीव तस्करीचे रॅकेट उघडकीस आले आहे.

Apr 25, 2026 - 21:08
 0  70
चेंबूर पोलिसांची मोठी कारवाई; हस्तिदंत तस्करी प्रकरणी ५ जणांना अटक, ३.५० कोटींचा मुद्देमाल जप्त
चेंबूर पोलिसांची मोठी कारवाई; हस्तिदंत तस्करी प्रकरणी

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २५ : चेंबूर पोलिसांनी हस्तिदंताची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ५० लाख ४० हजार रुपये किमतीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले असून, या प्रकरणामुळे वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी संदीप शिवप्रसाद परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसी मार्गावरील एका लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये काही जण हस्तिदंत विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश अशोक आकाडे (वय २८), संदीप रणधीर खिडलानी (वय ३३), शशांक चंद्रशेखर राणेकर (वय ३८) आणि दिनेश राम मनोहर अंबीवेशी (वय ४०) यांचा समावेश आहे. चौकशीत या आरोपींकडून आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आला. त्यानुसार नरेंद्र रघुनाथ मखवाळ (वय ४१) याला विक्रोळी कन्नमवार नगर परिसरातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून ३७ इंच लांबीचा व ११ किलो वजनाचा हस्तिदंत, ४३ इंच लांबीचा व २०.६ किलो वजनाचा दुसरा हस्तिदंत, तसेच चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३,५०,४०,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६१(२), ३(५) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ-६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश मालवे करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0