ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, विभाग संघटिका सुजाता नखाते आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, विभाग संघटिका सुजाता नखाते यांच्यासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे मंगळवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्योगमंत्री व संपर्कप्रमुख उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
हरेश नखाते यांच्यासोबत विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट तसेच काळेवाडी-रहाटणी परिसरातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. नखाते यांनी यापूर्वी ठाकरे गटाकडून महापालिका निवडणूक लढवून उल्लेखनीय मते मिळविली होती. त्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याचे मानले जात आहे.
यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या आशा भालेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचे संघटन सातत्याने मजबूत होत असून, पक्ष कार्यकर्त्यांना संधी आणि ताकद देणारा आहे. हरेश नखाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल आणि तळागाळात पक्षाची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0