जपतलाई आश्रमशाळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; राज्यातील ५१३ आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी
जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्यात येणार.
प्रतिनिधी : राजेंद्र किलनाके
गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट २०२६ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दुर्घटनेतील निष्काळजीपणासाठी जबाबदार संस्थाचालक आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधासह लागू कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, तसेच आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक आणि निवासी व्यवस्था करण्याचे निर्देशही मंत्री उईके यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची पुढील तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी
मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था, अंथरुण-पांघरुण व गाद्या, पिण्याचे पाणी आणि फिल्टरची व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वयंपाकगृह, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध उपाययोजनांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून घटनेबाबत तसेच शाळेतील उपलब्ध सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देताना आदिवासी विकास विभाग पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी व्यवस्था
जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांची १५ ऑगस्टपर्यंत चांगल्या निवासी सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध असलेल्या सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांना आवश्यक सर्व सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्याचेही मंत्री उईके यांनी स्पष्ट केले.
५१३ आश्रमशाळांची तृतीय पक्षीय तपासणी
जपतलाई घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आश्रमशाळांच्या व्यवस्थेचे सर्वंकष परीक्षण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची पुढील तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्याचे निर्देश मंत्री उईके यांनी दिले आहेत.
या तपासणीत विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था, इमारतीची सुरक्षितता, अंथरुण-पांघरुण, शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, स्वच्छता तसेच साप, विंचू, डास आणि अन्य कीटकांपासून संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची वस्तुनिष्ठ पडताळणी केली जाणार आहे.
तसेच सर्व आश्रमशाळांची वर्षातून किमान दोन वेळा प्रभावी तपासणी करावी. तपासणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष परिस्थितीची खातरजमा करणारी असावी. निष्काळजीपणा किंवा गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आश्रमशाळांच्या तपासणीचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण
प्रत्येक आश्रमशाळेची प्रत्यक्ष तपासणी करून त्याचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विशेषतः दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आश्रमशाळांना प्राधान्य देऊन प्रकल्प अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात, असे सांगण्यात आले.
तातडीच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेट शक्य नसल्यास व्हिडिओ कॉलद्वारे मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थी उपस्थिती, भोजन, निवास, स्वच्छता आणि अन्य सुविधांची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बेड, गाद्या, शुद्ध पाणी आणि सुरक्षात्मक उपायांवर भर
प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि स्वच्छ निवासी व्यवस्था उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत मंत्री डॉ. उईके यांनी आवश्यकतेनुसार पुरेसे बेड व गाद्या, स्वच्छ अंथरुण-पांघरुण, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ व दर्जेदार भोजन तसेच शौचालयांमध्ये पुरेसे पाणी आणि नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
साप, विंचू, डास आणि अन्य कीटकांपासून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय नियमितपणे करावेत. मुलींच्या वसतिगृहांसह आवश्यक ठिकाणी कीटकप्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात. शाळा आणि वसतिगृह परिसरातील गवत, झुडपे तसेच अस्वच्छता नियमितपणे दूर करून परिसर सुरक्षित ठेवावा, असेही निर्देश देण्यात आले.
विद्यार्थी उपस्थितीची आठ दिवसांत पडताळणी
आश्रमशाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थी आणि प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
एखादा विद्यार्थी सलग तीन दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्यास त्याच्या पालकांशी तातडीने संपर्क साधून गैरहजेरीचे कारण जाणून घ्यावे आणि विद्यार्थ्याला पुन्हा शाळेत आणण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, पालक सभा तसेच विद्यार्थी आणि पालकांशी सातत्यपूर्ण संवादावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्रुटींसाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित होणार
तपासणीदरम्यान आढळणाऱ्या प्रत्येक त्रुटीची स्पष्ट नोंद करून ती दूर करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी किंवा संबंधित संस्थेची जबाबदारी निश्चित करावी. इमारतीच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संयुक्त तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
“विद्यार्थी हा आपल्या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाची जबाबदारी आपली आहे. यामध्ये कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असे मंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.
मृत विद्यार्थिनीच्या पालकांचे सांत्वन
आश्रमशाळेच्या पाहणीनंतर मंत्री डॉ. उईके यांनी धानोरा विश्रामगृह येथे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या अनु गाजुर कोरेटी हिच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी शासन कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध शासकीय योजनांचा पात्रतेनुसार आणि नियमानुसार प्राधान्याने लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. घरकुल योजना, वनपट्ट्याच्या जमिनीशी व राहत्या जागेशी संबंधित प्रकरणे तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत गाय, बैलजोडी किंवा अन्य पात्र वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे कुटुंबाच्या शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींची विचारपूस
यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे भेट देऊन सर्पदंशाच्या घटनेनंतर उपचारासाठी दाखल असलेल्या बाधित विद्यार्थिनींची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रकृतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेत, विद्यार्थिनींना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कसूर राहू नये, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
या दौऱ्यादरम्यान आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, प्रकल्प अधिकारी तसेच आदिवासी विकास विभाग आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0